Tuesday, 7 March 2017

स्मार्टसिटी

             स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये नाशिकचा नंबर लागला हि खऱ्या अर्थाने महत्वाची गोष्ट आहे.  परंतु, स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा विकास खऱ्या अर्थाने होणार का? हे बघावं लागेल. स्मार्ट सिटीच वार सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहताना दिसतं. परंतु, स्मार्टसिटी संकल्पना समजावून घेऊन त्यावर विचार व्हायला हवा.  केंद्र सरकार स्मार्टसिटीच्या नावाखाली फक्त आपल्या पक्षाचं नाव व्हावं, हे तर बघत नाही ना? हा संशय देखील येतो. 
             ते काहीही असो पण शहरामध्ये वाहत असलेलं स्मार्ट सिटीच वारं आणि नागरिकांमध्ये असलेली समाधानाची भावना लक्षात घेता, केंद्र सरकारची हि योजना सफल होवो व आजपर्यंत वीज, पाणी, रस्ते इ. मूलभूत गोष्टींपासून वंचित असणाऱ्या नागरिकांना त्या मिळो व एक तरी शहर स्मार्ट बनून आदर्श ठरावं हीच अपेक्षा सर्वजण करताना दिसतात. आज सरकारची प्रतिमा फेकू अशा स्वरूपाची झालेली दिसते. निवडणुकांच्या तोंडावरती मोठ मोठ्या घोषणा करणे आणि नंतर त्याचा विसर पडणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतायेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना तरी सफल होऊन देशाला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतील कि नाही याकडे सर्व देशाचं लक्ष लागले  आहे. आज भटकंती मध्ये हा विषय फिरताना महत्वाचा वाटला म्हणून बोलतो आहे. 
             नाहीतर आपलं नेहमीच आहेच, रस्ता ओलांडताना वृद्ध गृहस्थांना दुचाकीस्वाराने उडवले... आजोबा गंभीर जखमी.... शहरामध्ये घाणीचे साम्राज्य.... जनता हैराण.... लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड हलवण्याची मागणी.... सिडको भागात अनियमित पाणीपुरवठा.... वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली न गेल्याची नागरिकांची तक्रार.... शहरातील काही नवीन सिडको भागात अंधाराचे साम्राज्य. अंधारामुळे महिलांना रात्री घराबाहेर निघणे मुश्किल.... या आणि अशा अनेक बातम्या रोज पेपरला वाचतो. त्यामुळे स्मार्ट सिटी द्वारे या समस्या तरी लवकरात लवकर सुटाव्यात व शहर स्वच्छ व मूलभूत गोष्टींनी समृद्ध व्हावं हीच अपेक्षा..... धन्यवाद.

Monday, 6 March 2017

भटकंती...... एक छंद......

             गावात फिरत असताना विविध गोष्टी आपल्याला दिसतात. भटकंती म्हटलं की, काहीही काम धाम नसताना फिरणे. कुणाचं आमंत्रण नाही, कुणी बोलवलं नाही, बाहेर काही काम नाही, तरीदेखील फिरणे हि माझ्या भटकंतीची व्याख्या..... घरातून बाहेर पडायला कुठल्याही प्रकारच प्लॅंनिंग नसत, सोबत बाईक नाही, मोबाईल नसतो. प्रसाद एकटाच असतो. या फिरण्यात वेगळाच आनंद मिळतो. पहिली गोष्ट गाडी व मोबाइल शिवाय मी राहू शकतो आणि फिरत असताना मूर्ती तितक्या प्रकृती बघायला मिळतात. काही माणसं सोबत कुत्रं घेऊन फिरत असतात, काहींच्या सोबत बायको असते. पण या दोन्ही गोष्टीला मी अपवाद आहे. निसर्गातील व समाजातील वेगवेगळे पैलू पहावयास मिळतात. फिरत असताना गणपती मंदिराजवळ गेलो. सप्त्याचे कीर्तन चालू होते. दोन मिनिटं त्याठिकाणी थांबलो. कीर्तनकार महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरच महत्वाच्या वाटल्या.... आयुष्यामध्ये काही मागायचे असेल तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मागा. काही टाकून द्यायचं असेल तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार टाका. ब्रम्हरसाचे महत्व सांगताना 'नाम' हे सर्वश्रेष्ठ असून, मनुष्य नामाने हा जीवनरूपी भवसागर तरु शकतो. या ज्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या, त्या दुःखरूपी, अज्ञानरूपी जीवनामध्ये आशेचा किरण ठरू शकतात.  त्यामुळे हा दिवस अध्यात्माच्या कार्यात लागला. असाच आज बाहेर पडलो थेट गोल्फ क्लब मैदान. हे मैदान फिरण्यासाठी नाशिकमधील एकच नंबर. तब्बेत कमी करण्यासाठी काही लोक त्याठिकाणी येतात तर काही ग्रीन जिमच्या तिथे मेहनत करून अंग मोकळं करतात. महानगरपालिकेने 'ग्रीन जिम' सारखं व्यामाच  साहित्य बसवून अत्यंत चांगलं काम केलं. गोल्फ क्लब वरती फिरून झाल्यावर घरी जाण्यासाठी निघलो. मैदानापासून घर ५ किमी. आणि रात्रीचे ८ वाजले त्यामुळे रिक्षा पकडली व रायगड चौक सिडकोत उतरलो. पुन्हा टाळ, मृदुंगाचा आवाज आला. आज देखील विशेष ऐकायला मिळणार होत. महाराजांनी कीर्तनाला सुरुवातच केली होती. त्या कीर्तनाच वैशिष्ट्य म्हणजे एक ३ ते ४ वर्षाचं लहान मुलं आणि ६ ते ७ वर्षाची जनाबाई कीर्तनाच आकर्षण ठरत होते. महाराज काय सांगता हे कदाचित समजत नसावं पण मध्ये प्रमाण सुरु झालं की नाचायला सुरुवात. ते बघताना खूप छान वाटलं. कॅमेरा असता तर एक फोटो देखील बघायला मिळाला असता.

भटकंती...... एक छंद......

 प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची आवड असते, छंद असतो. ती व्यक्ती ती आवडीची गोष्ट आनंदाने करत असते. त्यामध्ये पुस्तक वाचन घ्या, लिखाण, क्रीडांगणावरील खेळ, पोहणे, पत्ते, व्हिडीओ गेम्ज खेळणे, या सर्व गोष्टी करण्यात वेगळा आनंद मिळत असतो. अशीच माझाही आवडीची एक गोष्ट आहे. ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण आहे. ती म्हणजे 'भटकंती'.......
          माझी आवड वेगळ्या स्वरूपाची आहे. शाळेत असताना देखील मी वर्गामध्ये कमी, बाहेर जास्त असायचो. भटकायची सवय मला लहानपणापासून आहे. रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस..... संपूर्ण वेळ नदीवर पोहण्यात, झाडावर चढण्यात, पेरू खाण्यात आणि गावभर फिरण्यात जायचा. त्यामुळे लहानपणचे ते दिवस आठवले तर, "लहानपण देगा देवा" हि अभंगाची ओळ आठवते. लहानपणीचे दिवस छान होते. अभ्यास न करता भरपूर मार्क्स मिळायचे. कारण सर सर्व ओळखीचे होते. शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये मात्र सहभाग असायचा. त्यामध्ये भाषण म्हणू नका, कबड्डी, खो-खो, रुंनिंग सगळ्या गोष्टी गाजवल्या आणि गाजल्यासुद्धा... त्यामुळे सर्व शिक्षक बऱ्यापैकी ओळखायचे. सांगायचं तात्पर्य एवढंच 'अभ्यास न करता मार्क्स मिळायचे'. हे सर्व ओळखून वडील  "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणायचे.... वाईट वाटायचं पण करणार काय? मनाला सवय लागली होती 'भटकंती'ची......